बाहुबली भारत (प्रतिनिधी) :
राष्ट्रसंत आचार्य भगवंत प. पू. श्री आनंदऋषीजी म. सा. यांच्या १२५व्या जन्मजयंती, मरुधर केसरी प. पू. श्री मिश्रीमलजी म. सा. यांच्या १३५व्या जन्मजयंती तसेच लोकमान्य संत प. पू. श्री रुपचंदजी म. सा. यांच्या ९८व्या जन्मजयंतीनिमित्त आनंद दरबार, दत्तनगर, कात्रज येथे अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम वात्सल्य-मूर्ती प. पू. इंदुप्रभाजी म. सा. आदी ठाणा ५ यांच्या पवित्र सान्निध्यात पार पडला.
कार्यक्रमात प. पू. दर्शनप्रभाजी म. सा. यांनी आपल्या वाणीमधून महापुरुषांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि अंधजनांच्या जीवनाबद्दल मौलिक शब्दांत भरभरून कौतुक केले. पौर्णिमा महोत्सवाचे औचित्य साधून अंधजन विकास ट्रस्टच्या २५० अंध बांधवांना भेटवस्तू व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
अंधजणांच्या या अनोख्या उपक्रमासाठी सुरेखा लखीचंद खिंवसरा यांनी गरजूंना भेटवस्तू दिल्या, तर गौतम प्रसादीचा लाभ राजश्री राजेंद्र गूगळे यांना मिळाला. कार्यक्रमाप्रसंगी सुयोग भंडारी यांच्या आठ उपवासांची सांगता झाली.
धर्मसभेत अंधजन ट्रस्टचे उपाध्यक्ष सालुंके यांनी भाषणात सांगितले की, “गुरु महाराजांमुळे हा योग जुळून आला. साधुसंत येणे हे दीपावली-दसऱ्यासारखेच मंगल असते, यात काही वावगे नाही. दानशूर लखीचंद खिंवसरा आणि राजेंद्र गूगळे यांनी आमच्या अंधजनांवर जी कृपा केली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.”
उपस्थित धर्मसभेचे स्वागत आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते सुधीर कोंढरे, अंधजन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार भोर, मुकेश छाजेड, मनोज बोरा, शिरूर कासार संघ अध्यक्ष सतीश चोरडिया, विजय मुणोत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुगराज चूत्तर, दिलीप संचेती, प्रमोद राका, सुभास पिरगल, विजय लोढा, प्रकाश भटेवरा, सुनील चोरडिया, जवाहर धोका तसेच आनंद दरबार दत्तनगरचे सर्व सदस्य, महिला मंडळ, युवक मंडळ आणि बहुमंडळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार उमेदमल धोका यांनी मानले, तर सूत्रसंचालन सौरभ धोका यांनी केले.