मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था सिंधुदुर्गात उबाठाचे आंदोलन

Admin
2 Min Read

बाहुबली भारत (प्रतिनिधी) : 

सिंधुदुर्ग : गेली ११ वर्षे सुरू असलेले मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अद्याप अपूर्ण असून, महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कणकवली ते बांदा रस्त्याची चाळण झाली आहे. याविरोधात उबाठा गटाने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गातील हुमरमळा येथे आज जोरदार आंदोलन केले. आंदोलकांनी रस्त्याची दुरवस्था, रखडलेले काम आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर रखडलेला महामार्ग लवकर पूर्ण करा असे फलक घेऊन घोषणाबाजी करण्यात आली तसेच महामार्गावरील खड्ड्यांची पूजा करून सरकारचा निषेध नोंदवला. मंत्री नितेश राणे यांनी १५ ऑगस्टपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले होते. ते न पाळल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी वैभव नाईक यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडले.

वैभव नाईक यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदे गटाचे  मंत्री दीपक केसरकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन महामार्गाची कैफियत मांडली. या भेटीनंतर वैभव नाईक म्हणाले की, आम्ही आंदोलन करत असताना बावनकुळे यांनी स्वतः पुढाकार घेत आम्हाला चर्चेसाठी बोलावले. त्यांनी सौजन्य दाखवत या विषयावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील विविध महसूल विषयांवरही सविस्तर चर्चा झाली. येथील पालकमंत्र्यांना फक्त आरोप-प्रत्यारोप करण्यातच रस आहे. मात्र बावनकुळे यांनी तसे न करता आम्हाला बोलावून आमचे प्रश्न जाणून घेतले आणि संवाद साधला. त्यांच्या या भेटीमुळे वैभव नाईक भाजपात प्रवेश करणार याची पुन्हा चर्चा सुरू झाली.

Share This Article
Leave a comment