जैन धर्म हा एक प्राचीन, स्वतंत्र आणि सूक्ष्म विचारसरणीचा मार्ग आहे. अहिंसा, तपस्या, अनेकांतवाद (अनेकता) ही त्याची जीवनरेषा, आणि ‘जगा आणि जगू द्या’ हे त्याचे मूलतत्त्व आहे. प्रत्येक सजीवात आत्मा आहे, त्याला समान मान मिळायला हवा, कोणाच्याही स्वातंत्र्यावर गदा येऊ नये आणि सर्वांचा कल्याणमार्ग खुला राहावा हेच या धर्माचे सार आहे.
जैन धर्माचे चार प्रमुख पंथ श्वेतांबर, दिगंबर, स्थानकवासी आणि तेरापंथी आणि त्यांचा पाया ‘आगम’ या पवित्र ग्रंथावर आधारित आहे. धर्माचे पाच महाव्रत अहिंसा, सत्य, चोरी न करणे, मालमत्तेचा लोभ न करणे, भोगविलास टाळणे. यांच्या आचरणातूनच जैन धर्माची खरी साधना घडते.
भगवान ऋषभदेव (आदिनाथ) यांनी स्थापन केलेल्या या धर्मात त्रिरत्नांचा (सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य) मार्ग मुक्तीचा आधार आहे. जैन धर्म कोणत्याही दुसऱ्या धर्माचा पोटहिस्सा नाही; तो स्वतःत पूर्ण, स्वतंत्र आणि आत्मनिर्भर आहे.
आजचा जैनीझम – प्राचीन तत्त्व, आधुनिक आव्हाने
आजचा जैन धर्म केवळ पंथात मर्यादित नसून त्या पंथांमधूनही अनेक पोटपंथ निर्माण झाले आहेत. वेगवेगळ्या धर्मगुरूंचे स्वतंत्र अनुयायी आहेत. खरी जैन शिकवण पाळणारे धर्मगुरू आणि श्रावक बोटावर मोजण्याइतकेच आहेत. तरी, शारीरिक, मानसिक आणि भावनिक हिंसेचा विरोध, धार्मिक सहिष्णुता, पर्यावरण संवर्धन, आणि आधुनिक जीवनशैली यांचा समन्वय हे आजच्या जैन धर्माचे प्रगत रूप आहे.
भारतापुरता मर्यादित न राहता जैन धर्म आता पाश्चात्त्य देशांपर्यंत पोहोचला आहे. प्राचीन सिद्धांतांना आधुनिक परिस्थितीशी सुसंगत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु या प्रकाशाच्या प्रवासाला काही सावल्या अडथळा निर्माण करतात.
संस्था, वर्चस्व आणि मर्यादित संधी
जैन धर्माचे ट्रस्ट आणि संस्था बहुतेक वेळा एका व्यक्तीच्या, त्याच्या समर्थकांच्या किंवा कुटुंबीयांच्या दशकानुदशके नियंत्रणात राहतात. ही सत्ता टिकवण्यासाठी कायदेशीर चौकटही वापरली जाते. यामुळे इतर सक्षम कार्यकर्त्यांना, विरोधकांना किंवा नवे विचार आणणाऱ्यांना संधी मिळत नाही.
५ किंवा १० वर्षे काम केल्यानंतर स्वेच्छेने पदत्याग करून इतरांना संधी देण्याची संस्कृती अपवादात्मक आहे. उलट, विरोध करणाऱ्यांची प्रतिष्ठा घालवून, समाजातून दूर करण्याची प्रवृत्तीही काही ठिकाणी दिसते. परिणामी काही बंधू जैन धर्मापासूनच दुरावतात. ही जैन धर्माची खरी शिकवण आहे का? “हम जैन भाई सब एक है” हा संदेश कृतीत का उतरू शकत नाही?
तरुण पिढीचा दूरावलेला सहभाग
आज जैन लोकसंख्या बोटावर मोजण्याइतकी राहिली आहे. त्यातही पाश्चात्त्य संस्कृती आणि आधुनिक जीवनशैलीमुळे तरुण पिढीचा धार्मिक जीवनातील सहभाग चिंताजनक पातळीवर कमी झाला आहे. लहान गावांत तरुण मुले-मुली चातुर्मासात सक्रिय असतात, पण मोठ्या शहरांमध्ये त्यांचा सहभाग नगण्य आहे. जर ही पिढी दूर गेली, तर आज होणारे चातुर्मास आणि धार्मिक अनुष्ठान भविष्यात कितपत उपयुक्त ठरतील हा गंभीर प्रश्न आहे. यावर सर्व जैन धर्मगुरूंनी एकत्र येऊन विचारमंथन करणे अत्यावश्यक आहे.
पत्रकारिता – केवळ कौतुक की खरी प्रबोधनाची साधना?
आज बहुतेक पत्रकार चातुर्मास किंवा धार्मिक कार्यक्रमांची फक्त तारीफ करतात. टीकेचा सूर कधी ऐकू येत नाही. कौतुकातून जाहिरात मिळवणे हा उद्देश झाला, तर लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता केवळ औपचारिकतेपुरती उरेल. खरी पत्रकारिता म्हणजे चांगल्या गोष्टींचे मनापासून कौतुक, चुकीच्या गोष्टींवर निर्भीडपणे टीका, प्रबोधनातून समाजाला योग्य दिशा देणे
हेच तत्त्व ‘बाहुबली भारत’ साप्ताहिक अंगीकारणार आहे. आम्ही गोड आणि कडू, दोन्ही सत्य मांडणार कारण सत्याचाच विजय टिकतो, आणि प्रबोधनातूनच परिवर्तन घडते.
बाहुबली भारत – आमची दिशा, आमचा निर्धार
हे साप्ताहिक केवळ बातम्यांचे पान नसून, जैन धर्माच्या मूळ तत्त्वांचा, समाजाच्या सत्याचा आणि सकारात्मक बदलाचा आरसा असेल. आम्ही चांगल्या कार्याला व्यासपीठ देऊ. चुकीच्या प्रवृत्तीवर बोट ठेवू. तरुण पिढीला जोडण्यासाठी नवे मार्ग सुचवू आणि समाजातील एकता वाढवण्यासाठी निर्भीड संवाद साधू
‘हम जैन भाई सब एक है’ हे फक्त वाक्य न राहता कृतीत उतरवणे हेच आमचे ध्येय आहे. बाहुबली भारत आपल्या धर्म, संस्कृती आणि समाजासाठी एक विचारमंथनाचे व्यासपीठ ठरेल अशी आशा आहे. या प्रयत्नांना आपली साथ सुद्धा तितकीच आवश्यक आहे. ती मिळेल या आशेसह हे पहिले पाऊल टाकीत आहोत.
– भरत पुनमिया
(संस्थापक /संपादक )